Skip to main content

हुंडा...

 हॅलो, मी राजेंद्र बोलतोय, मला आपल्या बँकेतून एक माहिती हवी होती....


पलीकडून काहीतरी बोलले असावे, त्यावर राजेंद्र बोलला,


होय सर, मला रिद्धी ची लग्नाची एक एफ डी बघायची होती. 


पुन्हा जरा थांबत राजेंद्र बोलला,


त्या एफ डी मध्ये किती पैसे जमा झाले असतील ते जरा सांगाल का???


इकडून राजेंद्र ची बायको, रोहिणी ऐकत होती. 


फोन ठेवल्यावर रोहिणी राजेंद्र ला म्हणली,


काय हो, किती जमा झालेत पैसे,


अग  आत्ताच नाही बँक उघडल्यावर सांगतो म्हणाले,


तुमचा काय हो अंदाज, किती झाले असतील जमा....


नाही ग सांगू शकत, मला आता सोय करायला पाहिजे ना रिद्धीच्या लग्नाची....


होय, पण मी काय म्हणते, आपल्याला झेपेल एवढंच करूया...म्हणजे नाकापेक्षा मोती जड नको....


अग पण लग्न जरी आटोपते घेतले तरी बाकी पाहुणचार लागेलच ना...


त्याची सोय करावीच लागेल नाही तर पोरीला सासरी त्रास नको....


अग म्हणून च मी घेण्यादेण्याची सोय करून ठेवतो म्हणजे आयत्या वेळेला पाणी उपसने नको....


म्हणजे नेमकं काय करायच ठरवलत???

 

एफ डी चे बघतो, जेवढे असेल तेवढे, बाकी जमा केलेले असेल ते, त्यातही नाही जमले तर मग कर्ज घ्यावे लागणार...


मी काय म्हणते, माझं सोनं आहेच की, ते कधी कामास यायचं, ते पण राहू द्या हाताला तुमच्या....


अग पण ते तुझं आहे , त्यावर माझा हक्क काय,


नवऱ्याला पैशासाठी वणवण भटकू देऊ न मी सोनं घालून मिरवू का???अडीअडचणीला कामात यावं म्हणून सोनं असतय...


बर बघू वेळेवर..... आता मी निघतो, एफ डी आणि जमा असलेले पैसे किती ते जरा बघतो.


रिद्धी ने सगळा संवाद ऐकला होता, तरीही काही न ऐकल्याचा आव आणत ती आपले काम करत होती, आणि रोहिणी ही काहीच न झाल्याचे भासवत होती. पुन्हा सायंकाळी तोच संवाद सुरू झाला. रिद्धीची पाहणी झाली, मुलाने पसंती दिली होती. आता देण्याघेण्याचे ठरणार होते. रिद्धीच्या डोक्यात राजेंद्र रोहिणीचा संवाद फिरत होता. रिद्धी दिसायला सावळी पण तेजदार, ब्लॅक ब्यूटी का काय ते असत ना अगदी तशीच सावळी ब्युटी असावी. नाकेडोळे चरचर असणारी रिद्धी स्वभावाने तितकीच मऊ होती. जवळचे कोण नातलग हे स्थळ घेऊन आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलाकडचे येणार होते, मुलगा नोकरी करणारा, घरी शेती, घरची परिस्थिती पण चांगली होती. रिद्धीलाही मुलगा आवडला होता. शांत स्वभावाची रिद्धी कधी मान वर करून बोलत नसे. आज तिला बैचेन वाटत होते. चार पाच दिवसापासून चाललेली राजेंद्र ची वणवण आणि रोहिणीची नातेवाईकडे गरज पडल्यास पैसे मागण्याची विनवणी बघत होती. तेच ते तिच्या डोक्यात फिरत होते. नकळत तिच्या डोळ्यातून थेंब पडला.....


" काय ग, आत्तापासूनच घर सोडून जाईल या विचाराने रडू येतंय की काय...."


जुही ने असे म्हणत मस्करीच्या नात्याने तिला एक चिमटा काढला. रिद्धीनेही हसत गोष्ट मोडून नेली. रिद्धीने साडी घातली होती, त्यावर एकदम हलकासा मेकअप केला होता आणि आज खरच सावळ रूप खुलून निघालं होतं.....आता रिद्धीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. राजेंद्र तिला बोलवायला आला होता. ती बैकठीत जाणार होती, पुन्हा गरज नसलेल्या प्रश्नाचे उत्तर देणार होती....


तुझं नाव काय??


बैकठीत असलेल्या पाहुण्याने माहीत असलेला प्रश्न केला. रिद्धीने खाली मानेनेच उत्तर दिले,


रिद्धी.....


आणि प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. रिद्धीने उत्तर दिले. आता स्वारी राजेंद्र कडे वळली होती. 


आम्हाला पोरगी पसंद आहेच पण ते देण्याघेण्याचे तेवढं....


बोलू की, आपल्या काय अपेक्षा तेवढं आम्हाला सांगा....


आम्हाला काहीही नको, फक्त तुमची मुलगी हवी...


हे वाक्य ऐकताच राजेंद्र खुश झाला पण ही खुशी क्षणाची होती, लगेच वाक्याला जोडत त्यांनी वाक्य पूर्ण केले..


पण जरा मुलाकडे चारचाकी गाडी नाही. त्याच बघा...


राजेंद्रने हिशोब लावला, गाडी दहा लाखाच्या घरात जाणार होती, पुन्हा एक पाहुणा बोलला,


आम्हाला काही नको फक्त मुलाला गळ्यात गोप असावा अशी त्याची इच्छा आहे....


राजेंद्र पुन्हा डोक्यात हिशोब लावू लागला.

दहा लाख आणि वरून हे दोन लाख...


पानपुड्यातील सुपारीचा भस्का खात एकाने मध्येच उचललं,


आमचं पोरगं सगळ्यात लहान, म्हणून लग्न जरा जोरात व्हायला पाहिजे, लग्न आणि आदरातिथ्याचे जरा बघता येईल तर पहा.... 


आता राजेंद्र चे डोके गरगरायला लागले होते. हिशोब वीस लाखाच्या जवळपास येऊ लागला होता. डोक्याचा घाम पुसत राजेंद्र म्हणाला,


जरा काही कमी करता येईल तर बघा, म्हणजे माझी तेवढी देण्याची क्षमता नाही हो...


अहो पण आमचा मुलगा नोकरीचा आहे, त्याला दुसरीकडे तर पंचवीस लाखावर बोलणे आले पण आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडली म्हणून आम्ही एवढ्यावर थांबलो....


रिद्धी हे ऐकत होती, तिने डोळे लावले , एका हाताने दुसऱ्या हातावर हात चोळण्याव्यतिरिक्त ती काही करू शकत नव्हती.


राजेंद्र पुन्हा झुकत बोलला,


पण माझ्याकडे देण्याकरिता एवढे नाही हो, बाकी मुलीला संस्कार आम्ही भरभरून दिले, तुमच्या घराचे ती गोकुळ करेल, घर जोडून ठेवेल, आणि तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही... आम्ही तिला तसे संस्कार दिले, शिक्षण दिले....


पण पाहुणेबुआ, आम्ही जास्त मगितलेच नाही. तेवढं तर द्यावं लागेल ना, आम्ही मुलाकडची बाजू....


शेवटी राजेंद्र काकुळतीला येऊन म्हणाला,


मला मान्य आहे, परंतु मी कर्ज काढून देखील एवढी बरोबरी नाही करू शकणार, माझी ऐपत नाही हो....


रिद्धी चे डोळे लाल झाले होते, मुलगी असण्याची आपल्या बापाला काहीही वाईट कर्म न करता सजा मिळत होती. पहिल्यांदा तिला मुलगी असल्याची लाज वाटत होती, आज कधी नव्हे ते वडिलांना झुकलेले पाहत होती.....


हे पहा पावणं, आम्हाला यापेक्षा ही चांगले स्थळ चालून येत आहे, आम्हाला जाण्याची परवानगी द्या....


राजेंद्र म्हणाला,


पावणं घाई करू नका, शांततेत घेऊ जरा आपण.....तुम्ही मागितले तेवढे मी द्यायला तयार आहे, फक्त काही गोष्टी लग्न झाल्यावर देऊ, सध्या कर्ज काढून पण तेवढं होणार नाही.....


असं कसं पावणं, तुमचं तर अस झालंय, जेवण आधी आणि गोड नंतर.... सगळं कसं एकत्र बर वाटत नाही का.....


रिद्धीच्या डोळ्यात आता आग लागली होती. सहनशक्ती चा अंत झाला होता, ती ताडकन जागची उठली, डोक्यावरचा पदर काढला, आणि म्हणाली,


आम्हाला काहीही नको म्हणत म्हणत माझ्या बापाची सगळी कमाई घ्यायला निघाले, वरून काय तर मुलगी संस्कारी पाहिजे, शिकलेली पाहिजे, शिकायला पैसे काय तुमचे आजे आणून देतात का?????


रिद्धीचा पारा चढला होता. राजेंद्र तिला गप करत होता पण तिने राजेंद्र ला खुर्चीवर आरामात बसवले आणि पुन्हा आग ओकू लागली ...


तुमचा मुलगा नोकरी ला ना, मग भीक मागायची सवय का लावताय.... होणाऱ्या बायकोकडून उपसायच आणि आपलं खदान भरायची सवय कोणी लावली????

पैसा माझ्या बापाकडे नाही पण भिकारी मला तुम्ही वाटायला लागलेत.....


त्यातला एक पाहुणा उठला न राजेंद्र ला म्हणाला,

 

संस्कार दिले म्हणाला ना मुलीला, असे का संस्कार तुमचे,


त्यावर रिद्धी म्हणाली,


विष सगळ्याच सापात असत काका, फक्त त्याला छेडण्याची कोणी हिम्मत करू नये, मग सर्पमित्र जरी असला तरी त्याला तो चावणारच....मूलाकडच्या बाजूनी मुलीच्या बापाचा अंत पाहायचा ठरवलाय... तुमच्या मुलीला हुंडा द्यायचा नसतो, मग लोकांच्या मुलीच्या बापाकडून का हवा असतो???? तिच्या बापाने दिलेला हुंडा तुम्हाला जन्मभर पुरणार नाही हो, पण त्या बापाला जन्मभर फेडावे लागेल.....तुम्ही मुलाकडचे कधी मुलीच्या बापाची दशा का समजून घेत नाही.... गेले कित्येक दिवस बापाच्या डोळ्याला डोळा नाही, माय काळजीने सुकून चालली आणि हे मी नुसती बघत होते, ते तर मुलीच्या सुखासाठी जीव ही देईल पण त्यांच्या जिवाच्या बदल्यात मला सुख पचनी पडणार नाही. एकीकडे म्हणतात, सुशिक्षित लोकं हुंडा घेत नाही मग हे जे अडून नडुन मागतात ते काय आहे???


राजेंद्र अवाक होऊन रिद्धीकडे बघत होता कारण पहिल्यांदा रिद्धीचा हा अवतार बघितला होता. रिद्धी राजेंद्र जवळ गेली, त्याच्या समोर खाली बसली आणि म्हणाली,


मी जसे समजते झाले ना तेव्हापासून बघतेय, माझा वाढदिवस आला की बापाला आनंद व्हायचा आणि मुलगी एका वर्षाने वाढली म्हणून कामाची क्षमताही वाढवायचा... मला शिकवताना कितीतरी वेळा बापाने उसने पैसे आणले, आईने काबाडकष्ट केले. एकवेळ उपाशी झोपलो पण संस्कार आयुष्यभर पुरेल एवढे केले. कुठला शानशोक नव्हता पण मोठ्यांचा आदर शिकवला . आणि या सगळ्यात शेवटी काय तर हुंडा येतो. लाज वाटते मला अशा पांगळ्या रुढींची..... आमच्या बापाला हुंडा द्यावाच लागेल कारण त्यांना त्यांच्या मुलीचे सुख हवे असते, पण जोवर तुम्ही ही प्रथा मोडकळीस आणणार नाही  तोवर हे बंद होणे नाही....असेच जर सुरू राहीले तर कोणताच बाप मुलगी होऊ देणार नाही. त्याची पोसण्याची ऐपत नसते म्हणून नाही तर समोरचे तेवढे समर्थ नसतील.....


मला माझ्या वडीलाचेच नाही तर जगातील सर्व मुलींच्या वडिलांचे कौतुक करावेसे वाटते की, जन्मापासून तीच सगळं करतात, आणि शिकवून, संस्कार देऊन दुसऱ्याच्या हाती हिरा देताना सोबत पैसा ही देतात. असे फक्त आणि फक्त मुलीचा बापच करू शकतो..." जगातील सगळ्या मुलीचे बाप पुण्यवान असतात म्हणून त्यांना मुली असतात."


तिला अजूनही बरेच बोलायचे होते पण मध्येच काहीतरी पडल्याचा आवाज आला. तिने डोळे उघडले. आई तिला हलवत होती, तिची झोप मोडली होती.म्हणजे जे घडले ते स्वप्नात घडले होते. 


अग रिद्धी तुला माहीत आहे का मुलांकडच्यानी आपल्याला काय मागितले,


ती आता घाबरली होती, पडलेले स्वप्न खरे होते की काय वाटू लागले, तिने कान टवकारत विचारले,


काय हवंय त्यांना हुंड्यात....


तू आणि तुझ्या घरच्यांचा आनंद.... बस एवढंच मागितले त्यांनी....


ती स्वतःशीच म्हणाली, 

बर झाले ते स्वप्न होते, पण सत्यात असे घडले असते तरी मी आज बोललेच असते...कारण आज बोलणे गरजेचे आहे तेव्हाच कोणत्या बापाला मानसिक त्रास आणि आत्महत्येला सामोरे जावे लागणार नाही.... तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे खरंच कौतुक वाटले आणि असा मुलगा आपला नवरा होणार याचा अभिमान ही वाटत होता. ती आईजवळ गेली आणि म्हणाली,


आई मला ना एक मस्त स्वप्न पडलं....


आई म्हणाली,


काय ग,


तिने आईला पाठीमागून धरले आणि म्हणाली,


माझ्या लग्नात तुम्ही दोघे मस्तपैकी हसत उभे होते, कोणतेही टेन्शन न घेता......



ती पटकन उठली आणिआनंदात तयारी करायला सुरुवात केली कारण आज तिचा राजकुमार येणार होता.....



( ही कथा काल्पनिक आहे. परंतु मुलीच्या लग्नाच्या वेळी प्रत्येक बापाची हीच अवस्था होत असावी ती मी या कथेच्या रुपात मांडली आहे. माझी कथा वाचून एकाने जरी हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला तर तेच माझ्या कथेचे श्रेय असेल. कथा कशी वाटली ते नक्की कळवा. )


- तेजस्विनी प्र. राऊत

tejswiniraut22@gmail.com

Comments

Popular Post

तीन मुलांचे चार दिवस - पुस्तक आढावा.

  लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  पृष्ठ संख्या - 152 (Pages) किंमत - 150₹ लेखक - विकास / आदर्श / श्रीकृष्ण प्रकाशन - साधना  2019 व 2020 मध्ये मी आदिवासी जमाती, आदिवासी भाग तेथील लोक, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाद्य, त्यांचा पोशाख, मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची संस्कृती पाहण्याचा योग "निर्माण"मुले आला, त्यानंतर विशेष ठरवूनच भ्रमंती केली. वर्धा जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाडे, तसेच गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग (जिथे मोबाइलला रेंज नसते) जिथं सामान्य माणूस जाण्यास कचरतोच, असे काही भाग तिथे सामाजिक काम करणाऱ्या मित्रांच्या ओळखीने पाहण्यात व समजून घेण्यात आले.      आजच्या या युगात आदिवासीयांशी  परिस्थिती व त्यांचा बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, अशा काही तरुणांच्या मी शोधात होतो. काही दिवसापूर्वी मी साधना प्रकाशनात (पुणे) पुस्तक खरेदी करायला गेलो असता, मला तिथे एक पुस्तक दिसले त्याच नाव होतं "तीन मुलांचे चार दिवस". त्या पुस्तकाच्या कव्हर वर तीन मूल सायकल घेऊन पाठीमागे भल्या मोठया बॅगा घेऊन दिसले. मी प्रभावित होऊन ते पुस्तकाचा सारांश वाचला. मला पु...

पुस्तकाचा आढावा - फकिरा

                                               Source : Google पुस्तक : फकिरा लेखक : अण्णाभाऊ साठे प्रकाशन वर्ष : 1959 पुस्तक प्रकार : कादंबरी (स्मृतिपर) मूळ किंमत :120/- पुस्तक पृष्ठ व प्रकाशक: 145 , सुरेश एजनसी अण्णाभाऊंचे साहित्य : तब्बल 32 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह, जवळपास दोन डझन पोवाडे, तितकेच लोकनाट्य / तमाशे, कित्येक लावण्या व इतर किरकोळ लेखन. "फकिरा" ही कादंबरीचे भारतीय भाषांबरोबर रशियन, झेक, पोलिश, जर्मन या भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत. सोबतच "फकिरा"ला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. लेखकाबद्दल माहिती :         अण्णाभाऊ साठे (1 ऑगस्ट 1920 - 28 जुलै 1969) यांना फक्त 49 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील अखेरची तीन दशके त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची होती. सांगली जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात (वाटेगाव) व गावकुसाबाहेर ठेवलेल्या मांग(दलित) समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण मिळाले ते जेमतेम अक्षर ओळख ...

छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते

काही दिवसांपूर्वी, स्वराज्याचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे लाडके राजे, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 390वी जयंती . मराठी मातीला स्वराज्याचे स्वप्न दाखवून पुर्ण करणार्या मातीच्या पुत्राची जयंती, आज खूप मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. पण महाराज एकच दिवसाच्या आठवणीसाठी आहेत का? की आयुष्यभराच्या आचारणासाठी?      प्रथम आपण महाराजांचं " स्वराज्य " आणि त्यानंतर "आजची महाराष्ट्रातील पिढी महाराजांचा वारसा कसा पुढे नेत आहे ?", हे या लेखात पाहणार आहोत.      ' स्व'राज्य म्हणजे स्वतःच राज्य . मोठा पराक्रम गाजवून, मराठी रयतेच स्वराज्य महाराजांच्या येण्याने पूर्ण झालं. नक्कीच ते मिळावंण एवढं सोप्प नव्हतच, कारण बलाढ्य अश्या आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. याबद्दल आपण बालपणी इयत्ता चौथीमधील महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाचलेच असेल, पण आज काही नवीन गोष्टी महाराजांबद्दल पाहायला मिळणार आहे.       शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आणि  वैभवशाली आहे. शिवाजी महाराज हे एक प्रचंड ज्ञानी, चतुर आणि दुरद...