कसे आहात सगळे ...?
बरेच दिवस झाले काही न काही निमिताने लिखाणातून तुम्हाला भेटायला यावं म्हणत होतो... शेवटी मिळाला एकदाचा तो मुहूर्त.
कोरोनामुळे आपण सर्व हाल-बेहाल असाल हे मला ठाऊकच आहे, कारण गेले 5 महिने झाले मी एकाच रूममध्ये असतो, बाहेर जाण्याचा चान्स नाहीच.
सारखं घरात राहून बऱ्याच जणांना नैराश्य जाणवत आहे. यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही; स्वाभाविक गोष्ट आहे ती. मला ही या नैराश्यातून जाव लागलं, अश्या वेळेस मी माझा जवळच्या व्यक्तींना, मित्र मैत्रिणी व घरच्या व्यक्तींना (ज्यांच्या सोबत आपल्याला मनमोकळं बोलायला चांगल वाटत) फोन करून किंवा जवळ असेल तर जाऊन मन मोकळं बोलत असे.
बऱ्याच जणांना या नैराश्याच्या जराजास्त त्रास होत होता; अश्या वेळेस मला आठवण झाली ती मी ज्या संस्थेच्या सानिध्यात कोरोना आधी होतो म्हणजेच "प्रयास हेल्थ" पुण्यातील नावाजलेली मानसिक आरोग्यासाठी व लैंगिक शिक्षणासाठी काम करणारी संस्था.
त्यांनी व इतर काही एक्स्पर्ट डॉक्टरांच्या मदतीने नेस्टर नावाची संस्था किंवा हेल्पलाईन (7775004350) म्हणू शकता चालू केली आहे. नेस्टर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी लोकांना "मोफत मार्गदर्शन/समुपदेशन" गेली अनेक वर्षे करत आहे. त्यांचा नंबर मी त्यांना देत असे (वरील नंबर तुम्ही पण इतराना देऊ शकता) आणि त्याचा खूप छान फायदा त्या सर्व लोकांना झाला.
ज्यामुळे मला हा लेख लिहावा वाटला ती गोष्ट म्हणजे; मी तीन दिवसा आधी 'व्हाट्सअप्प' वर लोकांचे स्टेट्स चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राच्या स्टेटस वरील फोटोमधील मजकूर पाहिला आणि विचार करायला लागलो, तो मजकूर कोणी तरी माझा मित्राला रिप्लाय म्हणून दिला होता. त्याचाच तो स्क्रीनशॉट होता.
त्यात म्हंटल होत, "लडकी का चारित्र साफ होना चाहीये सुंदर तो वैशा भी होती है....."
मी ते स्टेटस पाहून विचाराच्या दुनियेत कितीतरी खोल खोल जात होतो. मला कळत नव्हतं की लोकं दुसऱ्याच्या चरित्राबद्दल का बोलतात ?
खास करून तेव्हा जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला साधं ओळखत पण नाही. दुसरी गोष्ट, अशी की कुणाचं चरित्र कस आहे हे ठरवण्याचा अधिकार आपणाला कोणी दिला आहे ? तिसरी, जर आपण दुसऱ्यावर बोट दाखवतो तेंव्हा त्याआधी आपण स्वतःचे आत्मपरीक्षण तरी केले आहे का? चौथी...पाचवी... सहावी......खोल खोल विचारावर विचार करत बसलो होतो.
नक्कीच काही वर्षांपूर्वी मी या अशी वाक्य सोडून देत होतो आणि मला याबद्दल जास्त काही कळत पण नव्हतं. कालांतराने भरपूर गोष्टी घडत गेल्या, वाचन वाढलं, समविचारी लोकांसोबत उठण बसणं वाढल्याने कदाचित किंवा त्यावर माझी विचार करण्याच्या सवयीने मला इथपर्यंत आणून सोडले असावे.
मी म्हंटल चला, चारित्र्य आणि सुंदरता याबाबत आपण इतर लोकांची मत जाणून घेऊ आणि सोबतच काही नवीन विचार पण वाचायला मिळतील.
मी काही मित्र मैत्रिणीला तो स्क्रीनशॉट पाठवून दिला. त्यातील काहींचे उत्तर मिळाली, मला मिळालेली ७ उत्तरे पुढे देत आहे ( पुढील सर्वच्या सर्व विचार मला आवडलेच असे नाही, पण सर्वांचे वेगवेगळे मत असू शकतात). तुम्ही ही वाचा आणि यावर विचार करून तुम्हाला काय वाटते ते comment बॉक्समध्ये कळवा.....
१. स्त्रीच्या चारित्र्याचा संबंध कायम तिच्या योनीसुचितेशी जोडलेला असतो, म्हणजे तिचं लग्न होऊन ती तिच्या पतीकडे असेल तर ती चारित्र्यवान( मग जरी तिला तो पुरुष कितीही त्रास का देत असला किंवा तिचं कितीही लैंगिक,मानसिक आणि शारीरिक शोषण का करत असला तरी ! ). लग्न हा त्यातला कळीचा मुद्दा आहे, हे लग्न तिचं चारित्र्य अबाधित ठेवतं, असाच जणू एक विकृत विचार खुप इज्जतीचा मानून आपण जगतो.ज्या स्त्रीचं लग्न सामाजिक नियमानुसार लवकर झाले नाही किंवा तिची तशी इच्छा नसेल तरीही तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याचा रीतसर परवाना आपल्या समजाला सहज मिळतो..
त्यातल्या त्यात पहा वेश्या जी एका पुरुषाची शारीरिक भूक भागवते आपल्या जगण्यासाठी ती चारित्रहीन आणि जे पुरुष तिच्याकडे जातात, मग ते लग्न झालेले किंवा न झालेले असो ते चारित्र्यवान कसे ?
इथे प्रश्न हा स्त्रीच्या चारित्र्याचा नावाने तिला बंधनात ठेवण्याचा आहे त्यातून जात टिकवली जाते, कारण स्त्री जेंव्हा बंधनं मुक्त असते तेंव्हा ती इतर जातीतील पुरुषाशीही लग्न करण्याचा विचार सहज करू शकते अशी आंतरजातीय लग्न 'जात' नामक कीड संपवण्यासाठी मोलाच काम करतात. चारित्र्यच्या भयानक संकल्पना प्रस्थापित करून स्त्रीवर अनेक पद्धतीची बंधने घालून तिचे शोषण होत असते..
स्त्रीच्या चारित्र्याचे निकष हे केवळ हा पितृसत्ताक समाज व्यवस्था ठरवते.हा एक असा फुगा जो पितृसत्ताक पद्धतीने फुगवलेला आहे मग तो काळ कोणताही का असेना,तो फुगा कधीच फुटू नाही म्हणून ही व्यवस्था नेहमीच काम करते. - धनश्री आशा खरात
२. लोकांची वेश्या बद्दल अनेक वेगवेगळी मतं असू शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये लैंगिकतेला छुप्यापणे का होईना उच्चतम स्थान आहे. या प्रक्रियेतून सजीवांची निर्मिती झाले ज्याला आपण प्रजनन म्हणतो. प्रत्येक सजीवाची ही महत्त्वाची आणि सारखीच आढळणारी बाब दिसून येते. मनुष्याने मात्र याला नैतिकतेची झालर दिली. ही नैतिकता स्वतःच्या भीतीतून उत्पन्न झाली होती. आणि चारित्र्यवान नावाचं लेबल लावलं गेलं. अनेकदा वेश्यांच्या जीवनात जबरदस्ती झालेली दिसते, मनाविरुद्धची भावना दिसते. त्यावेळी मात्र या सगळ्या बाबी चुकीच्या असतात, अन्याय कारक असतात. मात्र इतर वेळी आणि ते स्वेच्छेने केलेले कृती असते. यामध्ये चारित्र, शील यांचा समावेश तिच्या पेक्षा समोरच्याला महत्त्वाचा वाटत असतो. बलात्काराला आपल्या देशात चुकीचं म्हटलं जातं, मात्र लग्न हे समाजमान्य बलात्काराचे उदाहरण आहे असे मला वाटते.
मग वेश्या आणि विवाहित स्त्री या दोघांमधील वेगळेपण काय आहे? हे वेगळेपण कदाचित समोरच्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मात्र तरीसुद्धा वेश्यांना तुच्छतेचा नजरेनं पाहिलं जातं. इतका कळतं मला, ती एक महिला आहे, सजीव आहे, म्हणजेच तिला भावना आहेत, स्वतंत्र भावना! त्याठिकाणी चारित्र्याचं आणि सुंदरतेच लेबल प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून लावत असतो. - अमित पवार
३. कधी कधी एक शब्द वाचून अवघा लेख लिहून काढते मी पण आज एक वाक्य असताना तब्बल दोन तास विचार करावा लागला. तेव्हा कुठे काय लिहावे हे थोडेसे ध्यानात आले. समजत नव्हते की कोण सुंदर आणि कोण चरित्रहीन?????
जी वेश्या आम्हाला समाजातील घाण वाटते, समाजाची कीड वाटते. तीच्या जवळ जाऊन झोपताना आम्हाला का काही वाटत नाही. म्हणजे आम्ही जोपर्यंत त्यांच्या अड्ड्यावर असतो तोपर्यंत ती जगातील सुंदर स्त्री जाणवते. आणि यदाकदाचित त्या भागात आमची गृहिणी गेली तर तिचे चरित्र मलिन ठरवले जाते.
जर तुम्हाला तिच्यासोबत झोपणे योग्य वाटत असेल तर तिचे समाजातील स्थान ही योग्य वाटायला हवे. वेश्या सुंदर असते कधी कधी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती चरित्र हीन आहे का????? तर माझे उत्तर नाही. ती चारित्र्य हीन नाही उलट तुमचे चारित्र्य अबाधित ठेवनारी एक देवता आहे. मला मूर्खपणाचा दर्जा दिला जाईल मी वेश्या ला देवता बोलले म्हणून पण मी नेहमी उलट बाजूने विचार करते कदाचित म्हणूनच ते बऱ्याच जणांना खुपते.
वेश्या आणि इतर मुली यात काही ही फरक नाही. दोघीही मुली आहेत, दोघीना हृदय आहे, दोघींना भावना आहेत दोघींनाही चरित्र आहे तसेच दोघींना समाजात समान स्थान, दर्जा मिळण्याचा अधिकार ही आहे. मग आम्ही वेश्यालाच का गृहीत धरतो??????
आता पुन्हा मी इतर मुलींवर येऊन ठेपते.
इतर मुली सुंदर असतात, त्यांच्या सुंदरतेचे तारीफ सुद्धा केलेले असते, तिच्या छातीवर बोट देखील ठेवलेले असते, तिच्या डोळ्यांचे काजळ ही कोणी चोरलेले असते, तिच्याही सुंदरतेचा मुरगळा झालेला असतो. मग ती चारित्र्यहीन नाही का?????
मला फक्त एकच म्हणावे वाटते की,कोणत्याही स्त्री ला आपण " सुंदर आणि चरित्रहीन " या दोन संकल्पनेत नको गुंतवायला. सुंदर असेल ते चारित्र्य हीन असेलच असे नाही आणि चारित्र्यहीन असेल ते सुंदर असेलच असे नाही. सुंदरता आणि चरित्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.एक बाजू पुढे आली तर साहजिक दुसरी बाजू झाकली जाईल. - तेजस्विनी
४. पुरुष आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो, तो (सगळे पुरुष अशे नसतात) इतका आंधळा होतो की समोरची व्यक्ती लहान आहे की मोठी आहे त्याला हे सुद्धा समजत नाही. पुरुषयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेश्या सारख्या बाया असतात तरी पुरुष आपली गरज भागविण्यासाठी बलात्कार करण्याच्या टोकापर्यंतही जातात. या सगळ्या गोष्टी मुलींवर स्त्रियावर होतात त्यांना हे सहन करावा लागत, एवढ्यावरच न थांबता ते स्त्रियांवर याच खापर फोडतात पुरुषावर नाही, अस का ??? वैशा या सुंदर असतात तर तर मग त्यांच्या सोबत लग्न का करत नाहीत लोक ? त्यापण स्त्रियाच आहेत की! - सोनाली
५. प्रत्येकाने त्यांची गुणवत्ता, कर्म, मूल्ये पाहिली पाहिजेत. मग तो पुरुष असो की स्त्री. जेव्हा आपण वरील मापदंडांद्वारे पाहतो तेव्हा "कसे दिसतो" याने फरक पडत नाही. महिलांच्या ड्रेसवर भाष्य करण्यापूर्वी, आपण पोर्नोग्राफीवर विचार करावा अशी माझी इच्छा आहे. ते वाईट का आहे ? माझ्या मते अश्लीलतेमुळे आपले मन गुन्हेगारीकडे वळते, कारण आपण ते सुख मिळवण्याकरिता पाहतो. जर स्त्रिया आपला पेहराव किंवा सुंदरता दर्शविण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्या वाईट गोष्टींना कारणीभूत ठरू शकतात कारण पुरुष संकुचित मनाचे असू शकतात. म्हणून खबरदारी घेणे नेहमीच चांगले असते.
याचा अर्थ असा नाही की ज्या स्त्रिया लहान पोशाख करतात ते वाईट आहेत, नेहमीच या गोष्टी प्रत्येकावर अवलंबून असतात.
म्हणून मला वाटते की आपण पदवीपेक्षा नैतिक आणि नीतिमत्तेवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे जस लैंगिक संबंध शिक्षण वगैरे. "जे आधीपासून होत परंतु आपण ते कालांतराने केवळ नष्ट केले." - अक्षय
६. आपल्याकडे चारित्र्य हा शब्द खूपच संवेदनशील आहे. प्राचीन काळापासून थोर संत, महात्म्यांनी सुद्धा चारित्र्यावर भाष्य केला आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनीसुद्धा चारित्र्याला खूपच महत्त्व दिले आहे, तस ते महत्त्वाच पण आहे म्हणा!
पण अलीकडे चरित्र्याची व्याख्या बदलत चालली आहे.
गौतम बुद्धांनी स्वतःच्या चारित्र्याबद्दल विचार करायला सांगितलं. स्वतःच चारित्र्या कसं असावं किंवा जीवनात आचरण कोणत्या प्रकारचा असाव, याबद्दल सांगितले आहे.
त्यांची शिकवण तर आपण घेतली नाही व अंगिकारली पण नाही, पण त्याच्या विरुद्ध आपण वागतो आहोत. म्हणजे आपण स्वतःच्या चरित्र्या बद्दल विचार करण्याऐवजी दुसऱ्यांच्या चारित्र्याचा जास्त विचार करतो.
असाच एक प्रसंग आहे. माझा मित्र एका मुलीवर खुप प्रेम करायचा, तिच्यासाठी काहीही करायला तयार अगदी मरण्यासाठी सुद्धा. परंतु त्याच मुलीने त्याला नकार दिला तेव्हा हा महाप्रेम मजनू, महा-ग्यानी बनून तिच्या चारित्र्याबद्दल बोलू लागला, ती खूपच घाण आहे, ती वाईट मुलांसोबत फिरते, तिची किती लफडी, असतील इत्यादी इत्यादी...
म्हणजे कालपर्यंत तिच्यासाठी तो मरायला, मारायला तयार होता. पण तिच्या एका नकाराने ती चारित्रहिन ठरवल्या गेली, म्हणजे आपली मानसिकता बदलत जात आहे. जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ती खराब कशी असू शकते ..???
मुळात आपलच चारित्र्य संपन्न नाही म्हणायचं, मग दुसऱ्या चारित्र्यावर बोलण्याचा किंवा दुसऱ्याला चारित्रहीन ठरवण्याचा आपल्याला अधिकार कोणी दिला आहे...? नाही का ?
जर प्रत्येकाने दुसऱ्याच्या ऐवजी स्वतःचे चारित्र्याचा अधिक विचार केला तर आपलच जीवन अधिक चारित्र्यसंपन्न होईल. यावर विचार करणे अवश्य आहे !!! - शोखत अली
७. चारित्र्य या शब्दाचा अर्थ आहे शील. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या त्रिसूत्री म्हणते प्रज्ञा, शील, करुणा. या संकल्पनांचा अभ्यास केल्यास असे जाणवते की, प्रत्येक व्यक्तीचे म्हणजेच स्त्री व पुरुष या दोघांचेही चारित्र्य शुद्ध असावे, असेच भगवान गौतम बुद्धांचे म्हणणे होते. परंतु आज जगभरातील विविध संस्कृतींचा अभ्यास केल्यास असे आढळून येते की, प्रत्येक संस्कृतीने स्त्रीला दुय्यम ठरवून, स्त्री एक उपभोगाची वस्तू आहे, असे जनमानसात बिंबवले.
मुळात आपण स्त्रीच्या चरित्र बद्दल का बोलायचे ? मुलींचेच चारित्र्य शुद्ध का असावे ? तर याचे उत्तर मुलगी किंवा स्त्री ही समाजाने दुय्यम ठरवली आहे.
पुरुष अथवा मुले कितीही चरित्र भ्रष्ट झाले तरी तो त्यांचा जणू काय नैतिक अधिकारच आहे, असा समज जनमानसात रुजलेला आहे. म्हणून मुलीच्या चरित्र्या विषयी जेथे बोलले जाते तेथे मुलाच्या चारित्र्या विषयी बोलणे गरजेचे आहे !
म्हणून आपण मुलीचे चारित्र्य शुद्ध असावे असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीची चारित्र्य शुद्ध असावे असे म्हणावे. "यत्र स्त्री पूजयनते तत्र रमनती देवता" - सुदर्शन
सुंदरता आणि चारित्र्य यापलीकडे जाऊन; नीतिमत्ता आदर, प्रेम आणि बंधुता जोपासणारा समाज घडवण्यासाठी आपण हे गुण आपल्यात बिंबवून समाजात एक नवीन सुरुवात करूयात.
या आधीही आम्ही स्त्रियांवरील अन्यान व समाजातील स्थान याबद्दल लिहिले आहे. 'स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण' हा आमचा लेख वाचण्यासाठी त्यावर क्लीक कराल.
चला तर भेटूया परत लवकरच... काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा.👍
लेखक : विनोद (एक_इंसान)
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. हाक...
२. त्याचे ते निशब्द उत्तर.....
३. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
४. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
Comments
Post a Comment